मुंबई | स्वबळावर लढण्याच्या गर्जना करणार्या शिवसेनेने अखेर भाजपशी युती केली. युती केली असली तरी कार्यकर्त्यांची मने जुळली नाहीत. युतीची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसला नाही. कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या नाहीत, त्यामुळे भाजप-सेनेची युती केवळ ‘मातोश्री’साठी आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी केली.
भाजप-सेनेची युती ही जनतेसाठी नव्हे तर वैयक्तिक स्वार्थासाठी आणि ‘मातोश्री’च्या बचावासाठी असल्याचा आरोप करून युतीला २५ पेक्षा जास्त जागा मिळणार नाही असे भाकीत राणे यांनी वर्तविले. भाजप अध्यक्ष अमित शहा व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल भाजप-सेना युतीची घोषणा केली. त्यानंतर आज नारायण राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. राणे म्हणाले, गेल्या साडेचार वर्षांत भ्रष्टाचार कमी झालेला नाही. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार लपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती केली आहे. राजीनामे घेऊन फिरणार्या खासदारांनी, सेनेच्या मंत्र्यांनी सत्तेचा लाभ उचलला. शिवसेनेने भाजपसोबत केलेली युती ही स्वार्थ आणि बचावासाठी आहे. युती झाली असली तरी कार्यकर्त्यांची मने जुळली नाहीत. ही युती म्हणजे ‘तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ असाच प्रकार आहे.
मी भाजपचा सदस्य नसल्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.मुंबईत मराठी टक्का कमी झाला याला शिवसेना कारणीभूत आहे, अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना भाजपच्या सांगण्यावरून केली, असे सांगून महाआघाडीत जाण्याचा विचार नसल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले. खा.संजय राऊत यांनी स्वतःची फजिती करून घेतली आहे. युती होणार नसल्याचा वल्गना राऊत यांनी केल्या होत्या. आता युती झाल्याने संजय राऊत कसे तोंड दाखवणार, असे ते म्हणाले.